
हवामान खात्याचा इशारा, एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णतेची लाट, पहा कसे असेल वातावरण

मुंबई – राज्यात सध्या उन्हाळ्यामुळे अंगाची काहीली होत असतानाच राज्यात मागील २४ तासांत विविध भागांमध्ये हवामानात बदल पाहायला मिळाले आहेत. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण राहिले, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हात पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

हवामान विभागाने पुढील ४८ तासांमध्ये राज्यात पुन्हा हवामान बदल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः विदर्भाच्या पूर्व भागात उन्हाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे विदर्भात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पुढील तीन दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचे लक्षण आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यात सलग तीन दिवस उष्णतेचा तडाखा सहन केल्यानंतर गुरुवारी तापमानात थोडीशी घट झाली. मात्र, ही स्थिती तात्पुरती असून, पुढील तीन दिवस तापमान पुन्हा वाढणार असल्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी सरासरीपेक्षा तापमान अधिक राहणार आहे. राज्यात उष्णतेचा पारा कडक असला तरी सध्या पश्चिम राजस्थानपासून वायव्य विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. याशिवाय मध्य-पूर्व बंगालचा उपसागर ते दक्षिण तामिळनाडू एक द्रोणीय स्थिती, याबरोबरच मध्य प्रदेश (दक्षिणपूर भाग) पासून ते गंगटोक पश्चिम बंगाल पार करून छत्तीसगड, झारखंडपर्यंत आणखी एक द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. या स्थितीमुळे राज्यात कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.
देशात वादळ आणि वीज कोसळल्याने बिहार आणि उत्तर प्रदेशात एकूण ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये ५९ आणि उत्तर प्रदेशात २५ जणांचा मृत्यू झाला. झारखंडमध्ये चार आणि हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. शेतात पाणी साचल्याने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.









