महाराष्ट्रात पुढील ‘इतक्या’ दिवस गारपीटीसह मुसळधार पाऊस

हवामान विभागाकडून रेड आणि यलो अलर्ट जारी, वादळी वारेही वाहणारे, सतर्कतेचा इशारा

मुंबई – भारत पाकिस्तान तणाव आणि उन्हामुळे वाढलेल्या तप्त वातावरणापासून महाराष्ट्राची सुटका होण्याची शक्यता आहे. कारण पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात सध्या ढगाळ वातावरण असून येथेही आज आणि आगामी काही दिवस पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगढ, मध्यप्रदेश येथेही पावासाचा अंदाज आहे. नैऋत्य राजस्थानपासून उत्तर झारखंडपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र पसरले आहे, जे वायव्य आणि पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगड सारख्या भागातून जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर, मराठवाड्यातील, छत्रपती संभाजीनगर, तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्यात एकाएकी गेल्या ४८ तासांपासून पावसानं हजेरी लावल्यामुळं ऊन्हाची तीव्रता कमी झाली असून, तापमानातही सुखद घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. बहुतांश भागांमध्ये हवेत गारवा निर्माण झाला आहे. मान्सूनसाठी वर्तवण्यात आलेल्या काही सुरुवातीच्या अंदाजांनुसार १३ मे च्या आसपास मान्सूनचे वारे अंदमान आणि निकोबार इथं दाखल होतील. त्यानंतर ते पुढील प्रवास सुरू करतील. त्यानंतर मान्सूनपुर्व पाऊस येईल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान पुण्यातही मंगळवारनंतर यलो अलर्ट देण्यात आला होता. पुण्याच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळपासुन पुण्याच्या बऱ्याच भागात पावसाला सुरुवात झाली आहे. कात्रज, कोंढवा, हडपसर, धायरी, मध्यवर्ती भागात पेठांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. अचानक सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे.

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनाही पिकांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. स्थानिक प्रशासनाने सध्या पूर परिस्थितीला तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी छत्री आणि रेनकोट सोबत ठेवावा, असा सल्ला देण्यात आला आहे.