राज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात उष्णतेची लाट कायम, हवामान खात्याचा अंदाज काय?, यलो अलर्टची घोषणा

पुणे – पावसाळा सुरु होण्यास सध्या एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी बाकी असताना राज्यातील हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. एकीकडे उष्णतेची लाट काही जिल्ह्यांमध्ये अचानक पावसाच्या सरी आणि गारपीटीचं आगमन होणार आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार आहे. पण सध्या ओडिशा ते पश्चिम बंगाल दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. हा पट्टा उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेला असून त्यामुळे या भागात वादळी हवामान तयार होण्याची शक्यता आहे. तसेच दुसरा कमी दाबाचा विभाग मध्य छत्तीसगडपासून मन्नारच्या आखातापर्यंत पसरलेला आहे. हा पट्टा विदर्भसोबतच तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधून जात आहे. त्यामुळे या सर्व प्रदेशात पावसाच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. हवामानातील या अचानक बदलामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे २७ आणि २८ एप्रिलला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथा आणि सांगली येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याचवेळी सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण त्याआधी म्हणजे २६ एप्रिलला सातारा, घाटमाथा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली या भागांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल अशी शक्यता आहे.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे, विशेषत: कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात. यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त पाऊस घेऊन येण्याचा अंदाज आहे. राज्यात सध्या ब्रम्हपुरी इथं सर्वाधिक म्हणजे ४५.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.