महाराष्ट्रातील या भागात जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागाकडून यलो अलर्ट, पहा कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस, उकाड्यापासून होणार सुटका

पुणे – राज्यातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण-गोव्यात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांची उकाड्या पासून सुटका होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार,पुढील पाच दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका पाऊस होणारा असून विदर्भातील काही जिल्ह्यांना येत्या दोन दिवसात म्हणजेच २१ मार्च व २२ मार्च रोजी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. मागील आठवड्याभरात विदर्भात कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे नागपूर, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यातील उष्णतेचा पारा ४२ ते ४३ अंशापर्यंत पोहचला होता. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली असून, काही जिल्ह्यांना यलो तर काहींना उष्णतेचा आॅरेंज अलर्ट देण्यात आला होता. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमधील काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसंच चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक भागात सध्या तापमान काहीसे घटले असले तरी लवकरच पुन्हा उष्णतेची लाट परतण्याची शक्यता आहे.

सध्याच्या हवामान स्थितीनुसार, राज्यात उन्हाचा तडाखा कायम राहणार असला तरी काही भागांत पावसाचे सावट दिसून येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभसगाने केले आहे.