महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली. या आगीत होरपळून १० मुलांचा मृत्यू झाला आहे, १६ जखमी झालेत. महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजच्या एनआयसीयू मध्ये शुक्रवार रात्री १०.४५ च्या सुमारास ही आग लागली.
जिल्हाधिकारी (डीएम) अविनाश कुमार यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये हे हॉस्पिटल आहे. आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, असं डीएमने सांगितलं. चिंताजनक प्रकृती असलेल्या बालकांना एनआयसीयूमध्ये ठेवलं जातं. एनआयसीयूच्या अंतर्गत विभागात ३० मुलं होती. त्यातील बहुतांश बालकांना वाचवलं असं झांसीचे कमिश्नर बिमल कुमार दुबे यांनी सांगितलं. झांसीचे वरिष्ठ पुलिस अधिक्षक (एसएसपी) सुधा सिंह यांनी सांगितलं की, १६ मुलांवर उपचार सुरु आहेत. घटनेच्यावेळी एनआयसीयूमध्ये ५० पेक्षा जास्ता मुलं होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना चांगले उपचार कसे मिळतील, ते सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. झांसी जिल्ह्यातील मेडीकल कॉलेडमधील ही दुर्घटना दु:खद आणि ह्दयद्रावक असल्याच योगींनी म्हटलं आहे. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना केलीय.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशावरुन उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक झांसी येथे पोहोचले आहेत. पाठक यांनी सांगितलं की, ‘फेब्रुवारी महिन्यात फायर सेफ्टी ऑडिट झालं होतं. जून महिन्यात मॉक ड्रील सुद्धा झालेलं. ही घटना का आणि कशी झाली, या बद्दल चौकशी अहवाल आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल’ ७ नवजात अर्भकांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. ३ मृतदेहांची अजून ओळख पटलेली नाही. मृत मुलांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची तर जखमी मुलांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.