वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

सार्वजनिक आरोग्य विभागाचा ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ उपक्रम; विविध माध्यमांतून आरोग्य जनजागृती

मुंबई – आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने ९ लाख २३ हजार ५०९ वारकऱ्यांना आतापर्यंत आरोग्य सेवा पुरविली असून, परतीच्या वारीमध्येही दि. १० जुलैपर्यंत विभागामार्फत वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत आतापर्यंत एकूण १,११४ वारकऱ्यांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे. त्यामुळे या वारकऱ्यांना जीवनदान मिळाले आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविली. या उपक्रमाच्या माध्यमातून पालखी मार्गावर आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, आरोग्य संदर्भ सेवा देण्यात आली. ५ चित्ररथांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी विभागामार्फत नावीन्यपूर्ण व कल्पक पद्धतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. वारकऱ्यांना पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्यासाठी विभागाचे ४,३७६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ रात्रंदिवस कार्यरत होते. पालखी मार्गावर वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहायक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाई कामगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटरवर ‘आपला दवाखाना’ तात्पुरता उभारण्यात आला होता. तातडीच्या आरोग्य सेवेसाठी फिरत्या दुचाकी वाहनासह आरोग्यदूत तैनात ठेवण्यात आले होते.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दरम्यान ३,५६,३८९ वारकऱ्यांना, श्री संत तुकाराम महाराज पालखी दरम्यान २,२९,१८३ तर श्री संत सोपानकाका महाराज पालखी दरम्यान १९,३६४ वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मानाच्या इतर पालख्या व दिंड्यांमध्ये ८५,३८६ वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली आहे.