
(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – बार मध्ये दारु पित बसले असताना मोठ्याने बोलत असल्याचा राग येऊन मॅनेजर व इतर दोघांनी तरुणाला बेदम मारहाण करुन जखमी केले.

याबाबत कैलास श्रीसेल आरेकर (वय २२) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मॅनेजर अनिकेत चव्हाण व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अप्पर कोंढवा रोडवरील ए सी इन रेस्टॉरंट अँड बारमध्ये ४ ऑगस्टला रात्री अकरा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास आरेकर व त्यांचे मित्र आकाश शैलेश गायकवाड व शेखर बाळू कांबळे हे दारु पित बसले होते. ते मोठ्याने बोलत असल्याने त्याचा राग मनात धरुन बारचे मॅनेजर अनिकेत चव्हाण व इतर दोघांनी त्यांचे जवळ येऊन त्यांना धक्काबुक्की केली. चव्हाण याने त्याच्या हातातील कड्याने फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. तिघांना हाताने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक येवले तपास करीत आहेत.









