
औद्योगीक वसाहतीतील संजीवनगर भागात पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या वृध्देस मारहाण करीत हातपाय बांधून गळय़ातील सोन्याचे दागिणे पळविल्याची घटना घडली. या घटनेत वृध्देच्या गळयातील सुमारे ७५ हजाराच्या अलंकारावर भामट्याने डल्ला मारला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रगिता प्रकाश गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. गुंजाळ कुटूंबिय सोमवारी (दि.२६) नेहमी प्रमाणे कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. गुंजाळ यांच्या सासू राधाबाई रामकृष्ण गुंजाळ (७०) या घरात एकट्या असतांना दुपारच्या सुमारास टी शर्ट व थ्री फोर पॅण्ट परिधान केलेल्या इसमाने त्यांचे घर गाठून पिण्यासाठी पाण्याची मागणी केली.

राधाबाई गुंजाळ या पाणी घेण्यासाठी घरात गेल्या असता संशयिताने त्यांच्या पाठीमागून जावून घरात कुणी नसल्याची संधी साधत त्यांना मारहाण केली. यावेळी संशयिताने वृध्देचे हातपाय बांधून त्यांच्या गळयातील दोन पदरी सोन्याची पोत, डोरले व मंगळसूत्र असा सुमारे ७५ हजाराचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.









