पुणे : भरधाव वेगात बुलेट चालवून बुलेटला बसवलेल्या मॉडीफाय सायलेन्सर मधून फटके फोडणाऱ्यांवर पुणे वाहतूक शाखेने दंडुका चालवला आहे. बुलेटला मॉडीफाय सायलेन्सर लावून कर्कश आवाज काढणाऱ्या व ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दुचाकींवर पुणे वाहतूक शाखेने विशेष मोहिम राबवून तब्बल 619 दुचाकी चालकांवर कारवाई करुन मॉडीफाय सायलेन्सर काढून टाकले आहेत.
वाहतूक शाखेच्या 27 वाहतूक विभागांमध्ये 29 मार्च पासून 31 मार्चपर्यंत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दुचाकीचे सायलेन्सर मॉडीफाय करुन देणाऱ्या 316 जणांवर कारवाई करण्यात आली. तर दुचाकींचे सायलेन्सर मॉडीफाईड करणाऱ्या गॅरेजवाले तसेच विक्रेते यांना देखील कारवाईबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. नागरिकांना अशा पद्धतीने दुचाकीस्वार कर्णकर्कश आवाज करत असल्याचे दिसल्यास पुणे पोलिसांच्या 8087240400 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती कळवण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
फरासखाना-18, विश्रामबाग-4, खडक-8, स्वारगेट -13, सहकारनगर -7, भारती विद्यापीठ -37, सिंहगड रोड -29, दत्तवाडी -16, वारजे -16, कोथरूड -17, डेक्कन -21, लोणीकंद -20, समर्थ -12, बंडगार्डन -12, लष्कर -6, वानवडी -21, कोंढवा -25, हांडेवाडी -33, हडपसर -44, मुंढवा -85 व लोणी काळभोर-10 अशा कारवाया या विभागांमध्ये करण्यात आल्या.
ही विशेष मोहिम पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त प्रविण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वाहतूक परिमंडळात 27 ठिकाणी राबवण्यात आली.