‘भाजपात असतो तर आज मंत्री झालो असतो’

नागपूर – विधानसभेत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर महाविकास आघाडीचा शपथविधी पार पडला. यात जवळपास ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नवनिर्वाचित मंत्र्यांना अद्याप मंत्रीपदे मिळाली नसली, तर शपथविधीनंतर महायुतीत नाराजी नाट्य सुरू झाली आहेत. यात पहिली बाजी शिवसेनेच्या आमदाराने मारली असून, एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
भंडारा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही पाठवला आहे. मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा असतानाही मंत्रीपद न मिळाल्याने भोंडेकर नाराज आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. ते म्हणाले, ‘भाजपा प्रवेशाचा मला आग्रह असताना मी शिवसेनेत आलो याचा मला पश्चाताप होत आहे. मला भाजपात येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा आग्रह होता. मलाही ते आवडतात. परंतु मी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आता पश्चातापाची वेळ आल्यासारखे वाटत आहे. इथं शिवसेना काहीच नाही, आम्ही आमच्या ताकदीवर निवडून आलो आहोत, असेही भोंडेकर म्हणाले आहेत. आपला कुठेही विचार न करता मागून आलेल्यांना तुम्ही मंत्रिपद देता हे दु:ख वाटण्यासारख आहे. प्रामाणिकतेला काही अर्थ राहत नाही हे दिसून येते. या सगळ्या गोष्टींवर भविष्यात मी परिस्थिती आल्यावर बोलेल असा इशाराही आमदार भोंडेकरांनी दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटातील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. तसेच त्यांनी मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना उपनेता पदाचा देखील राजीनामा दिला आहे.
शिवसेनेत बंड झाल्यानंतर अपक्ष आमदार भोंडेकर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. तर या वेळेची निवडणुक त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लढवली होती. यंदा मंत्रिमंडळाचा विस्तार करताना अनेक मोठ्या नेत्यांना वगळण्यात आले आहे. तसे अनेक नव्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे भोंडेकरांची नाराजी दुर करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.