
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन, संस्कृत भाषेतून घेतली शपथ

मुंबई – गुजरात राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत. सुरुवातीला मुख्य सचिव राजेशकुमार यांनी देवव्रत यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधीनंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
राज्यपाल देवव्रत यांचा अल्प परिचय :
नाव : आचार्य देवव्रत,राज्यपाल, गुजरात
वडिलांचे नाव : श्री.लहरी सिंह
जन्मदिनांक : १८ जानेवारी १९५९
पत्ता : राजभवन,सेक्टर–२०, गांधीनगर – ३८२०२०, गुजरात
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर,पदव्युत्तर (इतिहास आणि हिंदी), बी.एड.
योगशास्त्रातील डिप्लोमा
नैसर्गिक चिकित्साशास्त्र व योगिक सायन्समध्ये डॉक्टरेट
अनुभव :
अध्यापन व प्रशासन क्षेत्रात ४५ वर्षांचा अनुभव.
१२ ऑगस्ट २०१५ ते २१ जुलै २०१९ या काळात हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून कार्य.
या कालावधीत नैसर्गिक शेती, गोसंवर्धन, “बेटी बचाओ-बेटी पढाओ”, सामाजिक ऐक्य, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड व जलसंवर्धन अशा कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली.
२२ जुलै २०१९ पासून गुजरातचे राज्यपाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात प्रसार. गुजरातमध्येच ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी रासायनिक शेती सोडून नैसर्गिक शेतीचा स्वीकार केला.









