
‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन, या मंत्र्यावर जबाबदार

मुंबई – पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माहिती देताना सांगितले की, पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप देसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायं. ६ वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी श्रीनगर येथून विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल. मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता यावा, यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात २४x७ मदत कक्ष/आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
१) दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543
२) व्हॉट्सअॅप : 7006058623, 7780805144, 7780938397









