
एसटी कामगारांच्या आंदोलनानंतर सरकार बॅकफूटवर, संघटनेच्या तीन मागण्या मान्य, कर्मचाऱ्यांना इतके रुपये मिळणार

मुंबई – महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने सोमवारी सकाळपासून आझाद मैदानात सुरू केलेले आंदोलन सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर मागे घेतले आहे.

एसटीच्या ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे जाहीर केला. तसेच, वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे. एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्वावर एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यासाठी शासनाने ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच २०२०-२४ दरम्यानच्या वेतन फरकाची वाढीतील रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
साडेसहा हजार रुपये मूळ वेतनातील फरक, सण अग्रीम आणि सहा हजार रुपये दिवाळी भेट अशा एसटी कामगारांच्या एकूण तीन मागण्या या बैठकीत मंजूर करण्यात आल्या. उर्वरित मागण्यांवर येत्या तीन महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे मान्य केल्यामुळे १४ ऑक्टोबरपासून राज्यभर सुरू होणारे धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय कामगार संयुक्त कृती समितीने घेतला आहे.









