खुशखबर! या’ तारखेला जमा होणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता

सरकारकडून तारखेची घोषणा, ‘एवढ्या’ निधीची तरतूद, या महिलांना नाही मिळणार लाभ?

मुंबई – राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

मंत्री तटकरे यांनी याबदल आपल्या ट्विटर खात्यावरूनही याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की,” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ! योजनेतील सर्व पात्र महिलांना २६ जानेवारी २०२५ पर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ३६९० कोटी रुपयांच्या निधीस मान्यताही दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे.” राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे, असेही तटकरे म्हणाल्या आहेत. दरम्यान राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना ही आमिष नव्हे तर महिला सशक्तीकरणाची योजना आहे. या योजनेमुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत नसल्याचेही राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. लाडकी बहीण योजनेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी ऑक्टोबर महिन्यात राज्य शासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. याचबरोबर राज्य शासनाने सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून ही योजना कार्यान्वित केली आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळण्याची विनंतीही राज्य शासनाने प्रतिज्ञापत्रात केली आहे. त्यामुळे न्यायालय कार्य निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डिसेंबरपर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्यांच्या उत्पन्नात वाढ झाली, अशा महिलांनी लाभ परत केला. ज्या महिलांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिला या योजनेतून कमी होतील, अशी माहिती समोर आली आहे.