आनंदवार्ता! महिन्याच्या सुरवातीलाच गॅस सिलेंडर स्वस्त

सलग पाचव्यांदा गॅस सिलेंडर स्वस्त, तुमच्या शहरातील काय भाव, नवीन दर आजपासून लागू

मुख्य- ऑगस्ट महिन्याची सुरुवात ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली आहे. देशभरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग पाचव्या महिन्यात कपात झाली आहे. यंदाच्या महिन्यात सुमारे ३४ रुपयांची घट झाली असून, यामुळे हॉटेल्स, कॅन्टीन, व्यवसायिक वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत अद्याप कोणताही बदल झालेला नाही.

मार्च २०२५ पासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने घट होत असून, आतापर्यंत एकूण १७० रुपयांची कपात झाली आहे. जुलै महिन्यातही व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची कपात झाली होती. हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर आता १५८२.५० रुपये झाला आहे. पूर्वी त्याची किंमत १६१६ रुपये होती. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक बाजारातील नैसर्गिक गॅसच्या किंमती कमी झाल्याचा थेट परिणाम देशांतर्गत दरांवर दिसून आला आहे. दरम्यान, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गृहिणींना यावेळी काहीही सवलत मिळणार नाही. घरगुती सिलिंडरच्या किमती पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहेत. मोदी सरकारने घरगुती गॅसच्या किंमतीत एप्रिलमध्ये ५० रुपयांची दरवाढ झाली होती. तेव्हापासून त्यात कपात अथवा वाढ झालेली नाही. दिल्ली घरगुती सिलेंडर ८५३ रूपयांना आहे. तर मुंबईत ८५२ तर पुणे येथे ८५६ रूपयांना सिलेंडर भेटत आहे.

तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅसच्या किमती जाहीर करत असतात. यामध्ये कधी गॅस सिलिंडरचे भाव कमी तर कधी जास्त होतात. यावेळी मात्र गॅस सिलिंडरच्या किमती अपेक्षेप्रमाणे कमी झाल्या आहेत.