राज्य शासनाची सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज

सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवस आधीच होणार पगार, गणपती पावला, परिपत्रक जारी, कारण काय?

मुंबई – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारची आर्थिक कमतरता भासू नये म्हणून राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नोकरदार खुश आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा ऑगस्ट महिन्याचा पगार हा लवकर म्हणजे ५ दिवस आधीच होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला होतो. मात्र यावेळी गेल्या महिन्याचा पगार १ सप्टेंबरऐवजी २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. गेल्या महिन्याचा पगार यावेळी पाच दिवस आधीच देण्यास राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्य सरकारचा हा निर्णय जिल्ह परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारक यांनाही लागू राहणार आहे. गणेश उत्सवाला यावर्षी राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने परिपत्रक काढून निर्णय जाहीर केला. दरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देखील २६ ऑगस्टला म्हणजेच गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला होणार असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्ट, २०२५ ला होत आहे. यासाठी मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्रमांक ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्रमांक ३२८ मधील तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत असल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले.