गुड न्यूज! ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटसाठी मुदतवाढ

राज्य सरकारचा मोठा निर्णय, चाैथ्यांदा मिळाली मुदतवाढ, पण ही कारवाई होणारच

मुंबई – महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत जुन्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम मुदत होती, ती आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील २ कोटी ५४ लाखांहून अधिक जुन्या वाहनांपैकी केवळ २० टक्के वाहनांवरच एचएसआरपी बसवली गेली आहे, तर १० टक्के वाहनमालकांनी बुकिंग केली आहे. उर्वरित ७० टक्के वाहनांवर अद्याप एचएसआरपी नाही. तांत्रिक अडचणी आणि जटिल प्रक्रियेमुळे वाहनमालकांना नंबर प्लेट बसवण्यात अडथळे येत आहेत. यापूर्वी सरकारने तीन वेळा मुदतवाढ दिली आहे, तरीही मोठ्या संख्येने वाहनधारकांनी ही प्लेट बसवलेली नाही. परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी वाहनधारकांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले, “१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसवावी. ज्यांच्याकडे ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉइंटमेंट आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे, लवकरात लवकर HSRP प्लेटसाठी नोंदणी करा,” असं आवाहन करण्यात आले आहे. १ डिसेंबर, २०२५ नंतर ‘एचएसआरपी’ न बसवलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई केली जाईल. तपासणीमध्ये जप्त केलेली वाहने ‘एचएसआरपी’ बसवल्याशिवाय सोडली जाणार नाहीत. ज्या वाहनधारकांना ३० नोव्हेंबरपर्यंत ‘एचएसआरपी’ बसवण्यासाठीची अपॉइंटमेंट मिळाली असेल, त्यांच्यावर मात्र कारवाई होणार नाही. राज्यात वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्यात सिंधुदुर्ग (एमएच ०८) जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे, तेथे ३३ टक्के वाहनांना ही पाटी बसवण्यात आली. त्यानंतर वर्धा (एमएच ३२), नागपूर ग्रामीण (एमएच ४०), सातारा (एमएच ११) आणि गडचिरोली (एमएच ३३) या आरटीओ कार्यालयांचा क्रमांक लागतो.

‘एचएसआरपी’ बसवलेली नाही, त्यांच्यावर काही निर्बंध आधीच लागू करण्यात आले आहेत. ‘एचएसआरपी’ शिवाय वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढवणे किंवा उतरवणे अशी कामे करता येणार नाहीत. आता यापुढे वाहनांची पुर्ननोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण यांसारखी कामेही (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) थांबवण्यात येणार आहेत.