
वर्षाअखेर सोने होणार २ लाख प्रतितोळा?, चांदीच्या भावातही मोठी वाढ, जाणून घ्या दरवाढीचे कारण?

मुंबई – सोन्याच्या भावात तेजी सुरु असून सोन्याने अखेर लाखाचा टप्पा ओलांडला आहे. सुवर्णनगरी म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावात सोमवारी सोन्याने लाखाचा उंबरा ओलांडला! तोळाभर सोन्याचा भाव ९९५०० रुपयांवर गेला. जीएसटी आणि घडणावळ मिळून तोळ्याचा भाव लाखाच्या वर गेला आहे.

सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून सोन्याच्या दरात रात्रीतून पुन्हा १५०० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर ९९५०० रुपये झाले आहेत. तर जीएसटीसह हेच सोन्याचे दर १०२००० रुपये इतके झाले आहेत. अजूनही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता सोने व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि चायना मधील ट्रेड वॉर सोन्याच्या किंमती वाढीस कारणीभूत असल्याचं मानले जात आहे. दरम्यान काहीच दिवसांवर अक्षय तृतीया असल्याने देखील सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर लग्नसराई असल्याने सोने महाग झाले तरी खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी जवळपास अशक्य गोष्ट झाली आहे. येत्या ३० एप्रिलला अक्षय तृतीया आहे. हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. यादिवशी सोन्याचा भाव एक लाखांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज होता. मात्र, त्यापूर्वीच सोन्याच्या भावाने लाखाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठेल, अशी शक्यता आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख १ हजारांवर पोहोचला आहे. चेन्नई आणि बंगळूरमध्येही सोने १ लाख पार झाले आहे. दरम्यान १ जानेवारी २०२५ ला २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,५७७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्यानंतर आता सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ९९५०० इतका झाला आहे. म्हणजेच चार महिन्यात सोन्याच्या भावात जवळपास २३ हजार रूपयांची वाढ झाली आहे. खासकरून मागील दोन महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षाच्या शेवटापर्यंत एक तोळा सोन्याचा भाव हा २ लाखांची पातळी गाठेल, असे भाकीत काही तज्ज्ञांनी वर्तविले आहे. तसे घडल्यास लग्नसराईसाठी सोने खरेदी करणे, सर्वसामान्यांना अशक्य होणार आहे.
चांदी आणि सोने दोघेही सोबतच वाढतात. सोन्यापेक्षा चांदीचे दर जास्त वाढण्याची शक्यता आहे. बाजारात काही दिवसापूर्वी १ किलो चांदीचा भाव ९६,३१० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव ९६३ रुपये होता. तो आता प्रति ग्रॅम १०१.१० रुपये आणि प्रति किलो १,०१,१००रुपये आहे. त्यामुळे चांदीची देखील चांदी झाली आहे.









