सोने झळाळले! सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा विक्रमी वाढ

चांदीही चमकली, सोन्याच्या किमती वर्षाखेर एवढ्या लाखापर्यंत पोहोचणार?, दरवाढीचे कारण काय?

मुंबई – सोमवारचा व्यावसायिक दिवस सुरू होताच सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले. देशातील डेरिव्हेटिव्ह बाजारात सोन्याच्या किमतीत ₹१,३५० ने वाढ झाली, तर चांदीच्या किमतीत ₹२,००० पेक्षा जास्त वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर अनिश्चितता असल्यामुळे सोने महाग होत आहे.

मागील काही दिवसांत झालेल्या थोड्या घसरणी नंतर सोन्याच्या भावात पुन्हा वाढला आहे. सोन्याचा २२ कॅरेट दर आज ११,०७० रुपये प्रति ग्रॅम एवढा आहे, तर १८ कॅरेट सोन्याचा दर ९,०५८ रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ११९,६२० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १०९,६५२ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १४७,४७० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,४७५ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात फरक असतो, परंतु आज मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता यांसारख्या शहरांत सोन्याचे दर जवळपास याच दरांच्या आसपास आहेत. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमतीत नाट्यमय वाढ झालीआहे. फक्त एका वर्षात सोन्याच्या किमती जवळजवळ ५०% ने वाढल्या आहेत. शिवाय, या काळात सोन्याने निफ्टी आणि इतर प्रमुख निर्देशांकांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.