लाखाच्या घरात पोहोचलेल्या सोन्याचे दर गडगडले, झाले स्वस्त

दोन दिवसातच सोन्याच्या दरात घसरण, ग्राहकांना दिलासा ! पहा तुमच्या शहरातील भाव, घसरणीचे कारण काय?

पुणे – सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात घसरणीला सुरुवात झाली आहे. बुधवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली. त्यामुळे अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे.

गुरुवारी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात ११०० रुपये प्रति १०० ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९८३५० रुपयांवरुन ९८२४० रुपये इतका झाला आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर ९०१५० रुपयांवरुन ९००५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. तर १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याच्या दरात ८० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर ७३,७६० रुपयांवरुन ७३६८० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सोन्याच्या किमतीने एक नवा उच्चांक प्रस्थापित केला असला तरी अवघ्या एका दिवसाच्या काळातच सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण दिसली आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थातच २२ एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. इतिहासात पहिल्यांदाच सोन्याची किंमत एका लाखाच्या वर गेली. २४ कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचली होती. दरम्यान, अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध काहीसे सौम्य होण्याची शक्यता निर्माण झाली असून, तशी तयारी अमेरिकेनेही दाखविली आहे. त्यामुळे सोने भाव कमी झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

काही दिवसापूर्वी सोने दर जीएसटीसह एक लाखाच्या वर गेला होता. यामुळे लग्न सराईत वाढलेल्या किंमतींनी वधू-वराकडील मंडळी चिंतेत सापडली आहे. मात्र आता त्यात घसरण होताना दिसत आहे. त्यातच सोन्यात येत्या काही वर्षात मोठ्या घसरणीचे संकेत पण काही तज्ज्ञ देत आहेत.