
आठवड्यात सोने तब्बल इतक्या रुपयांनी वधारले, चांदीही खातेय भाव, वर्षाअखेर एवढा होणार सोन्याचा भाव?

मुंबई – जागतिक व्यापार आणि भूराजकीय तणावामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत उसळी दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. गेल्या आठवड्यातही ही किंमतीतील उसळी दिसून आली आहे.

गेल्या आठवड्यात सुरुवातीला सोन्याने चार दिवसात २१०० रुपयांची मुसंडी मारली होती. ४ सप्टेंबर रोजी किंमतीत थोडीपार घसरण दिसून आली. तर ५ सप्टेंबर रोजी ७६० रुपयांनी किंमती वधारल्या. त्यानंतर सोने ८५० रुपयांनी महागले. दिवाळीत सोन्याचा भाव १ लाख २५ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता पण व्यक्त होत आहे. गुडरिटर्न्सनुसार, सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव १,०८,६२० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ९९,६०० रुपये इतका आहे. या वर्षी सोन्याच्या किमतींनी रॉकेटच्या वेगाने उसळी घेतली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर १ जानेवारी २०२५ रोजी १० ग्रॅम सोन्याचा भाव ७९,६७७ रुपये होता, जो आता १,०७,७४० रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच, या वर्षी आतापर्यंत प्रति १० ग्रॅममागे २८,०६३ रुपयांची वाढ झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीच्या चार दिवसात चांदी २१०० रुपयांनी वधारली. ४ सप्टेंबर रोजी चांदीच्या दर स्थिर होते. तर ५ सप्टेंबर रोजी चांदी एक हजारांनी घसरली. आता एका किलो चांदीचा भाव १,२८,००० रुपयांवर पोहचला आहे. दरम्यान, सरकारने सोने आणि चांदीवरील 3 टक्के जीएसटीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यामुळे, आता गुंतवणूकदारांचे लक्ष सप्टेंबरमध्ये होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे आहे.
वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सोने आणि चांदीवरील जीएसटी स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही.









