भारत पाकिस्तानमध्ये युद्ध विराम होताच सोन्याच्या किमतीत बदल

भारत पाकिस्तान तणावामुळे सोन्याच्या दरात चढ उतार सुरूच, पुढे सोन्याचा भाव वाढणार की स्वस्त होणार पहा?

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर कमालीचे तेजीत आहेत. गेल्या महिन्यात अर्थातच एप्रिल सोन्याच्या किमतीने एक नवीन रेकॉर्ड तयार केला होता. या नव्या वर्षाच्या अगदी सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत.

सोन्याच्या किमती वाढत असताना २२ एप्रिलला मोठी घटना घडली होती. कारण त्या दिवशी सोन्याचे दर एक लाख रुपये झाली होती. त्यानंतर सातत्याने सोन्याच्या किमती कमी होत राहिल्यात. पण, अजूनही सोन्याच्या किमती एका लाखाच्या आसपास आहेत, यामुळे सोने अजूनही सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेरच आहेत. सध्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये १८ कॅरेट सोन्याचे भाव ७४ हजार १० रुपये प्रति दहा ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे भाव ९० हजार ४५० रुपये प्रति दहा ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याचे भाव ९८ हजार ६८० रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. मागच्या दोन दिवसात सोने दरात ९०० रुपयाची घसरण झाली आहे. युद्धजन्य स्थिती निवळताच आणि बाजारात स्थिरता परतताच सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सध्याच्या स्थितीत सोन्याच्या दरात सातत्याने चढउतार सुरूच राहण्याची शक्यता आहे. भविष्यातही सोन्याच्या किमती अशाच तेजीत राहण्याची शक्यता आहे. या मौल्यवान धातूच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत असे निरीक्षण तज्ञांनी नोंदवले आहे. सोन्याची मागणी पाहता या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा दर प्रति औंस ३७०० डॉलर पर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर भारतात हा दर एक लाख १५ हजार रुपये प्रति तोळा होण्याची शक्यता आहे. मात्र २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत म्हणजेच मार्चनंतर, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत प्रति औंस ४ हजार डॉलरचा टप्पा ओलांडू शकते. त्यावेळी भारतात सोन्याची किंमत एक लाख २५ हजार रुपये प्रति दहा ग्राम होण्याची शक्यता आहे.

सोन्याचे भाव एकीकडे चढताना दिसतात तर चांदीनेही आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे. एका आठवड्यात चांदीच्या किमतीत एक हजार रुपयांपर्यंत वाढ झाली. सध्या देशात एक किलो चांदीची किंमत ९९,००० रुपये इतकी आहे. यंदा सोने सुमारे २०,९०७ रुपयांनी तर चांदी ९६६९ रुपयांनी महागली आहे.