सोन्याच्या दराचा भडका, आज एका तोळ्याची किंमत किती?

सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, चांदीही तेजीत, कशामुळे वाढत आहेत सोन्याच्या किमती, आठवड्यात इतके महागले सोने

पुणे – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरात झळाळी पाहायला मिळत आहे. दररोज सोन्याचा दर नवा विक्रम होत आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. वायदा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.१० लाख रुपयांवर पोहोचला आहे.

रोज सोन्याच्या दरात तेजी असली तरी आज सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भावही ६६ रुपयांनी घसरून १,०८,९७१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जीएसटीसह त्याची किंमत आता १,१२,२४० रुपये आहे. त्यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. २२ कॅरेट सोन्याचा भाव ६० रुपयांनी घसरून १,००,२१९ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. जीएसटीसह तो १,०३,२२५ रुपये झाला आहे. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ४९ रुपयांनी घसरून ८२,०५७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडला आणि जीएसटीसह तो ८४,५१८ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. त्याच वेळी, १४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह ६५,९२४ रुपयांवर पोहोचला आहे. देशात सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगावच्या सुवर्णबाजारपेठेत सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा विक्रमी झेप घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेले दर मंगळवारी तब्बल १४४२ रुपयांनी वाढले. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे जीएसटीसह दर प्रति १० ग्रॅम १ लाख १३ हजार १९७ रुपयांवर पोहोचले. फक्त एका दिवसात दीड हजार रुपयांच्या आसपास वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. महत्वाचे म्हणजे १ ते ९ सप्टेंबर या कालावधीत सोन्याने तब्बल ४७३८ रुपयांची झेप घेतली आहे. आठवडाभरापासून स्थिर असलेली चांदी देखील १०३० रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे जीएसटीसह चांदीचे दर प्रति किलो १ लाख २९ हजार ७८० रुपयांपर्यंत पोहोचले. आठवडाभर स्थिर असलेली किंमत अचानक वाढल्याने चांदीची मागणी देखील काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, सोन्याचे दर प्रचंड वाढल्याने लहान प्रमाणातील ग्राहकांनी खरेदी टाळल्याचे चित्र दिसते. तरीदेखील, दरवाढीमुळे आर्थिक उलाढाल फारशी घटलेली नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेतील कमकुवत कामगार बाजारातील आकडेवारीमुळे चलनविषयक धोरणात सवलतीची शक्यता वाढली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेकडे वळले आहेत. डॉलरच्या घसरणीमुळे सोने-चांदीच्या किमतींमध्ये वाढ होण्यास आणखी मदत झाली आहे.