महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, नाहीतर उडवून टाकू

उपमुख्यमंत्री अजितदादांची हातात एके ४७ घेत पत्रकारांना गोड धमकी, व्हिडिओ व्हायरल

पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि मिश्किल स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या एका विधानाने गंभीर वातावरण देखील हलके फुलके होत असते. आता अजित पवार यांनी केलेल्या एका विधानाने वातावरण चांगलेच विनोदी झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे व चाकण येथील आधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हातात एके ४७ घेत अजित पवारांनी ती पत्रकारांवर रोखली आणि महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हा सर्वांना उडवून टाकू अशी विनोदी धमकी दिली. विशेष म्हणजे आता हे एवढचं दाखवतील आणि छापतील असे सांगायलाही अजित पवार विसरले नाहीत. दोघांचाही हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा चांगलेच हसताना बघायला मिळाले. तर दोन्ही नेत्यांसोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील व्हिडीओत दिसत आहेत. त्यानंतर आणखी एका कार्यक्रमात शिट्ट्या कशाला वाजवता, शिट्ट्या वाजऊ नका, मुख्यमंत्री येथे आले आहेत. शिस्त आहे की नाही? आता शिट्ट्या वाजविल्या तर पोलिसांना उचलायला सांगेन असा इशारा हुल्लडबाजी करणा-या तरूणांना दिला होता.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मिश्किल शैलीसाठी नेहमीच ओळखले जातात. अनेकवेळा केलेल्या रोखठोक वक्तव्यांमुळे अजित पवार हे अडचणीत सुद्धा आले आहे. मात्र त्यांच्या अशा भाषणांमुळे अनेकदा ते चर्चेचा विषय ठरतात.