
अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण, प्रियकरला हडपसर पोलीसांच्या बेड्या

पुणे – परीक्षेच्या अभ्यासात असल्याने प्रियकराला काही दिवस भेटणे जमले नाही. त्यामुळे प्रियकराने अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.

प्रज्वल कैलास मोहिते असे या प्रियकराचे नाव आहे. याबाबत एका २६ वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजता घडला. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुळच्या नाशिक येथील राहणार्या आहेत. पुण्यात त्या शिक्षणासाठी आल्या़ असून सध्या मांजरी येथे भाड्याने रहात आहेत. त्यांची प्रज्वल मोहिते याच्याशी २०२१ पासून ओळख असून त्यांचे प्रेमसंबंध आहेत. प्रज्वल याचा व्यवसाय आहे. परिक्षा जवळ आल्याने फिर्यादी या अभ्यास करत असतात. त्यामुळे त्यांचे प्रज्वल याच्याशी भेटणे झाले नाही़ तसेच त्यांनी फोनवर बोलणे टाळत होत्या. दरम्यानच्या काळात प्रज्वल याने त्यांना फोनवर त्यांच्याकडे असलेले फिर्यादी यांचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असे. रविवारी तो त्या रहात असलेल्या घरी आला. यावेळी त्याने फोनवर न बोलण्याबद्दल जाब विचारला. तसेच केस ओढत मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने महिन्द्रा थार गाडीत चालकाजवळ बसविले. चालकाला चाकणच्या दिशेने गाडी घेण्यास लावली. चालकाच्या शिटजवळ पडलेली तुटलेली टोकदार प्लॅस्टिक पट्टीने त्याने या तरुणीला खांद्यावर, हातावर, मनगटावर, दोन्ही पायांच्या पोटरीवर मांडीवर मारहाण करुन जखमी केले. डोक्यावर बुक्की मारुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर प्रियकराने तिच्यावर श्वास रूग्णालयात उपचार देखील केले.
पुण्यात आल्यावर या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने प्रज्वल मोहिते याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गेंड पुढील तपास करीत आहेत.









