नात्यात लग्न केल्याचे फायद्याबरोबर तोटेही, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
मुंबई – भारतात अनेक वर्षांपासून जवळच्या नात्यामध्ये खासकरून मामाची मुलगी- आत्याचा मुलगा यांच्यातील लग्नाचे प्रमाण खूप जास्त आहे. सोशल मिडियावर तशी गाणीही लोकप्रिय आहेत. रिल देखील व्हायरल होत असतात. पण आता एका संशोधनात धक्कादायक परिणाम समोर आले आहेत.
जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात आनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते. इतर आरोग्यविषयक समस्या जास्त असू शकतात. मात्र, या गोष्टीला वैज्ञानिक आधार नसल्याने नात्यामधील लग्नांना उत्तेजन दिले जाते. मात्र परळ येथील जनुकीय संशोधन केंद्रामध्ये, आयसीएमआर, एनआयआरआसीएच येथील संस्थेने एक संशोधन करत नात्यातील लग्नाचे फायदे तोटे काय आहेत याची मांडणी केली आहे. या अभ्यासासाठी ६६ जोडप्यांची निवड करण्यात आली होती. त्यांचे जनुकीय समुपदेशन तसेच वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यातील ५८ जोडप्यांमध्ये ‘कायरोटापिंग’ ही जनुकीय चाचणीही करण्यात आली. या चाचण्यानंतर केलेल्या विश्लेषणातून ३१ टक्के जोडपी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या आनुवंशिक विकाराचे वाहक असल्याचे आढळून आले. नात्यातल्या लग्नामध्ये आनुवंशिक दोष पुढील पिढीमध्ये येण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्ताच्या संसर्गासह, चॅलेसेमिया, सिकलसेल, मतीमंदत्व, चयापचय स्थिती, वेगवेगळ्या मानवी प्रणालीमधील दोष अशाप्रकारची लक्षणे या जोडप्यांमधील बाळांमध्ये येऊ शकतात. सुमारे सत्तर टक्के जन्मजात व्यंगाचे योग्य जनुकीय समुपदेश आणि जन्मजात दोषांचे चाचण्यामुळे निदान होऊ शकते. यातील सत्तावीस जोडप्यांच्या बाळाची पुरेशी वाढ न होणे, अपुऱ्या दिवसांत गर्भपात किंवा मृत्यू होण्यामागील नेमक्या वैद्यकीय कारणांचे विश्लेषण त्यांना करता आलेले नाही. दरम्यान हा दोष काहीच जोडप्यामध्ये आढळला आहे. काही जोडप्यांमध्ये बाळाची वाढ सामान्य होती. त्यांना कुठलीही अडचण जाणवली नाही.
गेल्या दशकात भारतात आनुवंशिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या आजारांना कोणतेही उपचार नाहीत. ज्यांचे लग्न नात्यात झाले आहे त्यांनी घाबरून जाऊ नये; पण आनुवंशिक आजार टाळण्यासाठी वैद्यकिय सल्ला आणि उपचार घेणे गरजेचे आहे.
टीप – ही बातमी फक्त माहितीस्तव देण्यात आलेली आहे. लग्नाबाबत कोणताही सल्ला देण्याचा या बातमीचा अजिबात हेतू नाही