जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर गांजा तस्करी ; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर गांजाची तस्करी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पुण्याहून खोपोली येथे गांजा घेऊन जात असताना ही कारवाई केली आहे.

ही कारवाई जुना पुणे -मुंबई महामार्गावरील कार्ला फाटा येथील तेजस धाब्यावर करण्यात आली. आरोपींकडून ४८ किलो गांजासह १४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी दिली. नितीन शिवाजी लेहने , गणेश सुरेश दराडे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुरुवारी दि.११ जुलै रोजी माहिती मिळाली होती की, लोणावळा भागातील कार्ला फाटा परिसरात काही इसम हे चारचाकी वाहनांमधून गांजा विक्रीकरिता घेऊन येणार आहेत. त्यानुसार मध्यरात्रीपासूनच कार्ला फाटा परिसरात सापळा रचण्यात आला होता. पहाटे तीनच्या सुमारास जुने मुंबई पुणे हायवे रोडवरील तेजस धाब्याचे समोर एक संशयित वाहन थांबले. पथकाने गाडीतील व्यक्तींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने गाडीतील तिघांची झडती घेतली. तसेच चारचाकी वाहनाचे डिक्कि तपासली असता त्यामध्ये दोन पोत्यांमध्ये ९ लाख २० हजार रुपये किमतीचा ४८ किलो गांजा मिळून आला.

आरोपींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये हा गांजा विक्रीकरीता खोपोली येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. या कारवाईमध्ये ४८किलो गांजा, चारचाकी वाहन, मोबाईल असा एकूण १४ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी सरकारतर्फे फिर्यादी दिली आहे. त्यावरुन एन.डी.पी.एस ॲक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(ब) (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करत आहेत.