गँगवार आता जेलमध्ये, तुरुंगात मध्यरात्री खूनी थरार;एका कैद्याने दुसऱ्याला जीवे मारले

ळगावच्या कारागृहात मध्यरात्री खूनी थरार पाहायला मिळाला. पहाटे दीड वाजेच्या सुमारास एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे हा कैदी गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेत असतानाच या कैद्याने जीव सोडला.

मोहसीन असगर खान असं मृत कैद्याचं नाव आहे. भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र खरात यांचा हत्याकांडातील तो आरोपी आहे. पूर्व वैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना जळगाव कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्याचाच तुरुंगात खून करण्यात आल्याने पोलीसही हादरून गेले आहेत. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

यातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचं तुरुंगातील दुसऱ्या कैद्याशी काल दुपारी भांडण झालं. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. त्याचा राग मनात ठेवून दुसऱ्या आरोपीने आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास मोहसीन असगर खानवर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.

मयत असगर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी तुरुंगात धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. या हत्याकांडात दुसरा काही अँगल आहे का याचा तपास पोलीस करत आहे. मात्र, या घटनेमुळे भुसावळमधील गँगवार आता जेलमध्ये पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे.