टोळक्यांनी केला पोलिसांवर हल्ला, एकजण जखमी; 5 जणांना अटक

शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच जणांच्या टोळक्याने चोरीला गेलेला माल तपासण्यासाठी आलेल्या गुन्हे शाखा युनीट -५ च्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. पोलिसांना लाकडी बांबू आणि लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना रविवारी दि. ७ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास साळुंब्रे गावच्या हद्दीतील कासारसाई रोड लगत असलेल्या भंगार दुकानात घडली.

पोलीस नाईक अली अब्दुल शेख यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नईम शहा, नसीम शहा , कलीम शहा , नसीम मुदही, कलीम मुदही यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२)(३), १९०, १२१(१)(२), १३२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अली शेख हे गुन्हे शाखेच्या युनिट पाच मध्ये कार्यरत आहेत. अली शेख आणि त्याचे सहकारी पोलीस शिपाई अनिल निरवणे हे रविवारी दुपारी दोनच्या साळुंब्रे गावच्या हद्दीतील कासारसाई रोड लगत असलेल्या भंगार दुकानात चोरीस गेलेल्या मालाची तपासणी करण्यासाठी गेले होते. तपासणी करत असताना भंगार दुकानात असलेल्या आरोपींनी फिर्यादी व निरवणे यांना शिवीगाळ करुन लोखंडी रॉड घेऊन अंगावर धावून आले.

आरोपी नईम शहा याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी अली शेख यांच्या डोक्यात मारला. मात्र, शेख यांनी हात मध्ये घातल्याने अंगठ्याजवळ गंभीर मार बसल्याने ते जखमी झाले. तर इतर आरोपींनी लोखंडी रॉडने हातावर, पायावर, पाठीवर मारुन खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पोलीस शिपाई अनिल निरवणे यांना देखील धक्काबुक्की केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.