
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय, असे असणार नवीन नियम, एवढ्या महिलांना मिळणार लाभ

चंदीगड – महायुती सरकारने विधानसभा निवडणूकपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचा लाभ देण्यात येतो. आता तशीच योजना आता हरियाणा राज्यातही सुरू करण्यात आली आहे.

हरियाणा सरकारने सुद्धा महिलांसाठी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचे नाव दीनदयाल लाडो लक्ष्मी योजना असे आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. २५ सप्टेंबर पासून योजना सुरू होणार आहे. या योजनेची घोषणा करताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले, २५ सप्टेंबर २०२५ पासून राज्यातील २३ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व मुली आणि महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. महिला विवाहित असोत किंवा अविवाहित, सर्वांच्या खात्यात २१०० रुपये पाठवले जातील. मंत्रिमंडळाने दीनदयाळ लाडो लक्ष्मी योजनेला मान्यता दिली आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना समाविष्ट केले जाईल. नंतर, इतर उत्पन्न गटातील कुटुंबांनाही या योजनेत समाविष्ट केले जाईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी, अविवाहित महिला किंवा विवाहित महिलेच्या पतीने गेल्या १५ वर्षांपासून हरियाणाची रहिवासी असणे बंधनकारक असेल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात सुमारे १९-२० लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळेल असा अंदाज आहे.
या योजनेत कुटुंबातील महिलांच्या संख्येवर कोणतेही बंधन नसून जर कुटुंबात तीन महिला असतील तर तिन्ही महिलांना लाभ मिळेल. सरकारकडून आधीच चालवल्या जाणाऱ्या अशा नऊ योजनांमध्ये पात्र असलेल्या महिलांना लाडकी लक्ष्मी योजनेचा लाभ मिळणार नाही.









