जमशेदपूर येथील एका तरुणीनं एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या अधिकाऱ्याची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार पोलिसांनी तरुणीसह चार जणांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमशेदपूर येथील रहिवासी असलेल्या श्वेताची सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीतील अधिकारी मेहुल शाहसोबत मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही सुरुवातीला एकमेकांसोबत चॅट करत होते.
दरम्यान, दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि ते एकमेकांपासून विभक्त झाले. यानंतर श्वेता रांचीला वास्तव्यास आली. याबाबतची माहिती श्वेतानं आपल्या मैत्रिणींना सांगितली. यानंतर स्वेतानं मेहुलला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा कट रचला. आरोपी श्वेतानं आपले अश्लील व्हिडिओ मेहुलला पाठवून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तिनं मेहुलला मुंबईहून रांचीला बोलावलं. मेहुल रांचीला पोहोचताच श्वेता आणि तिच्या मैत्रिणींनी आधी त्याला शहरात फिरवलं. यानंतर तिनं मेहुलसाठी रांचीमधील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये रूम बुक केली. जिथे श्वेता आणि मेहुल थांबले होते.
यादरम्यान, श्वेतानं मेहुलचा अश्लील व्हिडिओ बनवला. या घटनेनंतर स्वेतानं मेहुलला तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसंच, तिनं हा व्हिडिओ मेहुलच्या कुटुंबीयांना पाठवण्याची धमकीही दिली. मेहुलच्या म्हणण्यानुसार, स्वेता आणि तिच्या साथीदारांनी त्याच्याकडून हवालाद्वारे अंदाजे ५० लाख रुपये उकळले. त्यानंतरही स्वेतानं त्याच्याकडे आणखी पैशांची मागणी सुरू केली. हे पैसे दिले नाहीत, त्यामुळं तिनं आपल्या मित्रांच्या मदतीनं मारहाण केली. दरम्यान, याबाबत पीडित मेहुलच्या पत्नीनं रांची विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्या आधारे पोलिसांनी श्वेतासह चार जणांना अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.