शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक, दोघांना अटक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या सायबर सेलच्या पथकाने अटक केली आहे. कर्जत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींना कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सतीश सुरेश बुंदेले , परेश गुलाब बिरदवडे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सायबर सेलचे पोलीस अंमलदार सुरज शिंदे यांना माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती दररोज वेगवेगळ्या व्यक्तींना बँकेत घेऊन जात असून तो त्यांचे खाते सुरु करुन घेत आहे. त्याच्यावर संशय आल्याने पथकाने तपास केला असता संशयित व्यक्तीने सिटी युनियन बँकेत खाते उघडले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बँक खाते धारकाची माहिती घेतली असता सतीश बुंदेले या नावाने खाते उघडल्याचे समजले. त्यानुसार सतीश बुंदेले याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याचा मित्र परेश बिरदवडे याने बँकेत खाते सुरु करण्यास सांगितले होते. खाते सुरु करण्यासाठी त्याने ऑनलाइन पैसे घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी परेश बिरदवडे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी कर्जत येथील एका व्यक्तीला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्यास सांगून जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवले. त्यातून त्या व्यक्तीची ११ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली होती. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात आयपीसी ४१९ , ४२० सह आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात दोघांचा सहभाग असल्याने त्यांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

गुन्ह्याचा समांतर तांत्रिक तपास सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी व पोलीस अंमलदार सुरज शिंदे, अतुल लोखंडे करीत होते. त्यांनी तांत्रिक तपसा केला असता आरोपी यांनी वेगवेगळ्या बँकेत सायबर फसवणूक करण्यासाठी अकाउंट काढल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी काढलेल्या बँक खात्यांविरुद्ध देशभरातून ४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.