माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत कुडाळ- मालवण मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याचे समजते.
निलेश राणे हे कुडाळ-मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत; परंतु हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे या जागेवरून लढण्यासाठी येत्या एक-दोन दिवसांत नीलेश राणे शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कुडाळ-मालवण मतदारसंघावर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वर्चस्व आहे. गेल्या दहा वर्षांपासून वैभव नाईक या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत; परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीला २७ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघातून लढण्यासाठी निलेश राणे आग्रही आहेत.
निलेश राणे हे माजी खासदार असून त्यांनी २००९ ते २०१४ या काळात सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते; परंतु त्यानंतरच्या २०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. आता शिवसेनेतील फुटीनंतर कोकणातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या संपूर्ण परिस्थितीत निलेश राणे यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघातून लढण्यासाठी दंड थोपटले आहेत.