
विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळे नाना पटोलेंना नारळ, स्थानिक निवडणूकीत पाठिंबा

मुंबई – विधानसभा निवडणूकीत दारूण पराभव झाल्यानंतर नाना पटोले हे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. त्यांनी सर्व पराभावाची जबाबदारी स्विकारत पदाचा राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली होती. पण मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे अनेक निर्णय पुढे ढकलण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसने १०० पेक्षा अधिक जागा लढवल्या, मात्र त्यात त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आलेत. यानंतर नाना पटोले यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. खुद्द नाना पटोले यांचा निसटता विजय झाला. तसेच नाना पटोले हे आरएसएसचे काम करत असल्याचाही आरोप करण्यात आला होता. आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा नाना पटोले राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याकडे ही जबाबदारी सोपवणली जाण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण हे आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. त्यांना हायकमांडकडून तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे, ते दिल्लीला रवाना देखील झाले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बनण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. याची काँग्रेसकडून दखल घेण्यात आली आहे. परिणामी महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षपदावर पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागू शकते. चव्हाण यांच्या नावाला अंतिम मंजुरी मिळाल्यास, त्यांच्यासमोर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसला प्रभावीपणे तयार करण्याचे मोठे आव्हान असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला नवा संजीवनी मिळेल, अशी शक्यता आहे. दरम्यान अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसून, पक्षांतर्गत चर्चा आणि सहमतीनंतरच अंतिम निर्णय जाहीर होईल.
विधानसभा निवडणुकीनंतर एकदाही मविआमध्ये संयुक्तरित्या बैठक झालेली नाही. विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठीही तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन चर्चा केली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मविआ एकत्र लढणार की नाही याबाबत साशंकता आहे.









