(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – फर्निचरचे काम करणाऱ्या कामगाराला टोळक्याने खंडणीसाठी बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भागिरथ राम बिष्णोई यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर जाधव, अनिकेत सपकाळे व त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मारुंजी येथील लाईफ रिपब्लीक कोलते पाटील या टाऊनशिपमध्ये रविवारी सकाळी ९ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सुतार काम करतात. त्यांचा चुलत भाऊ प्रकाश बिष्णोई यांच्या फर्निचरच्या दुकानात काम करतात. १५ दिवसांपूर्वी ते फर्निचरची ऑर्डर घेण्यासाठी नेरे भागात दुचाकीवरुन गेले असताना वाटेत एकाने त्यांना अडविले. तुम लोक यहॉपर बाहरसे आके इतना कमा रहे हो, उसमेसे कुल पैसा हमको देना पडेगा, असे म्हणाला. तेव्हा फिर्यादी यांनी त्यास हम तो गरीब मजदूर है, पैसा कहा से दे, असे सांगितले. त्यावर त्याने एक दिन देख लेंगे असे म्हणून निघून गेला.
फिर्यादी हे रविवारी सकाळी दुकानात असताना तिघे जण आले. त्या तिघांनी तुझे बोला था ना यहा पे कमाना है,
तो हमे पैसा देना पडेगा, लेकिन तू एसे मानेगा नही, असे बोलून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
लाकडी दांडक्याने पाठीवर, बरगडीवर, डोक्यात मारहाण केल्याने ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्येच शुद्ध आली.मारुंजी येथील सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल तपास करीत आहेत.