मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाच्या घरात गोळीबार ; रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटल्याने १३ वर्षाचा मुलगा जखमी, सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडी येथील बंगल्यावर काम करणार्‍या सुरक्षा रक्षकाच्या घरी एक घटना घडली आहे. रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन ते बॅगेत कपाटात ठेवले होते. मुलाचा धक्का लागून बॅग खाली पडली व गोळी सुटून १३ वर्षाच्या मुलाच्या पायाला लागून तो जबर जखमी झाला आहे.

अभय शिर्के (वय १३) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन हनुमंत शिर्के (वय ४०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजता शिर्के यांच्या घरात घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शिर्के हे मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडीतील बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आहे.

त्यांनी आपल्या परवाना धारी रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन कसलीही खबरदारी न घेता रिव्हॉल्व्हर असलेली बॅग कपाटात ठेवली. त्यांचा मुलगा अभय शिर्के याने कपडे घालण्यासाठी कपाट उघडले. त्याने शर्ट घातला. त्यानंतर पँट घालत असताना धक्का लागून कपाटातील रिव्हॉल्व्हर असलेली बॅग खाली पडून त्यातून गोळी सुटली. ती अभय याच्या उजव्या पायाच्या पोटरीला लागून तो जबर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे व अन्य अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील अधिक तपास करीत आहेत.