मुंबई – फडणवीस सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी पार पडला. महायुतीच्या तब्बल ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. तर अनेक महिला नेत्यांना मंत्री करण्यात आले आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ या महिला आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात मेघना बोर्डीकर यांनी अनोखा विक्रम केला आहे.
जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांचा त्यांनी पराभव केला. विशेष म्हणजे बोर्डीकर यांच्या रुपाने १४ वर्षांनंतर परभणी जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले आहे. मेघना बोर्डीकर पाच टर्म आमदार असलेल्या आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या आहेत. रामप्रसाद बोर्डीकर यांचा परभणी जिल्ह्याच्या राजकारणात मोठे वर्चस्व आहेत. ते पाच टर्म काँग्रेसकडून आमदार होते. विशेष म्हणजे पुण्यात डीआयजी म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी दीपक साकोरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत. सध्या दोन्ही मुले लंडनमध्ये शिक्षण घेत आहेत. राजकारणासोबतच बोर्डीकर या एक यशस्वी उद्योजिका आणि पीडीसीसी बँकेच्या (परभणी) संचालकही आहेत. पती अधिकारी आणि पत्नी मंत्री अशी बहुधा पहिली जोडी राज्याच्या राजकारणात दिसणार आहे.
मेघना बोर्डीकर यांनी डी.वाय.पाटील विद्यापीठातून (पुणे) बीएससी कॉम्प्युटर आणि इंटरनॅशनल स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतले आहे. महिला सक्षमीकरण, पक्षीय संघटनात्मक कामासह विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत.