जुन्या भांडणाच्या कारणवारुन चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडक पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांसह चार जणांवर सुधारित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार सोमवारी दि.८ जुलै रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास शुक्रवार पेठेतील एसआरए बिल्डींगच्या पार्किंगमध्ये घडला. राहुल शाम भरगुडे, सुमित जाधव व त्यांच्या एका साथीदारावर भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ११५(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राहुल भरगुडे, रोहन शेंडगे, सुमित जाधव हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज चव्हाण हा एसआरए बिल्डींगच्या पार्किंगमध्ये बसला होता. त्यावेळी आरोपी राहुल भरगुडे याने जुन्या भांडणाच्या कारणावरुन मनोज याला शिवीगाळ केली. तसेच तुला लय माज आला आहे का, याला चांगला धडा शिकवा असे म्हणाला. आरोपी रोहन याने फिर्य़ादीला गाडीवर बसण्यास सांगितले मात्र त्याने गाडीवर बसण्यास नकार दिला. याचा राग आल्याने फायटरने मनोजच्या तोंडावर मारुन जखमी केले. तसेच धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. मनोज खाली पडल्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.