पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. इंदापूर शहरापासून दोन ते अडीच किमी अंतरावर हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस पुण्याच्या दिशेने निघाली होती यादरम्यान इंदापूर बाह्यवळणापासून पुढे दोन ते अडीच किमी अंतरावर बसची दोन्ही टायर फुटल्याने हा अपघात झाला.
टायर फुटल्यामुळे बसचं नियंत्रण सुटलं आणि बस लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला जाऊन धडकली, यानंतर बस पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडून २५-३० फूट खाली जाऊन आदळली. या बसमध्ये नेमके किती प्रवाशी प्रवास करत होते हे अद्याप समजू शकलेले नाही. पण बसमधील १०-११ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिस आणि एनएचएआयचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ही बस सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याहून पुण्याच्या दिशेने निघाली होती.
इंदापूर पासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर ही बस TN 93B3062 क्रमांकाच्या मालवाहू ट्रकला जाऊन धडकली. या ट्रकमध्ये असलेलं लोखंडही रस्त्यावर पडलं. ट्रकला धडक दिल्यानंतर बस हायवे ओलांडून २५-३० फूट खाली रोडच्या बाहेर जाऊन आदळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तर दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.