नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची सात गाड्यांना धडक

नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटात रविवारी भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्यानंतर सात गाड्यांना कंटनेरने धडक दिली. या अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच १३ ते १४ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. या घाटात जाण्यासाठी आणि येण्यासाठी वेगवेगळे मार्ग तयार करण्यात आले आहे. त्यानंतर घाटातील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली. अन्यथा कसारा घाटात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत होते

रविवारी वीकेंडमुळे वाहनांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. त्याचवेळी नवीन कसारा घाटात विचित्र अपघात झाला. घाटातून जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला. त्यानंतर अनियंत्रीत झालेल्या कंटनेरने सहा ते सात गाड्यांना धडक दिली. या धडकेमुळे त्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यातील काही जण जखमी झाले. तसेच या अपघातात एकूण १३ ते १४ प्रवासी जखमी झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम आणि रुग्णवाहिका घटनास्थळावर पोहचली. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरु केले. तसेच वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु झाले. वीकेंडमुळे कसारा घाटामध्ये आज वाहनांची मोठी गर्दी असल्याने पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

.