आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेल्या बसचा भीषण अपघात;५ ठार, ४२ जखमी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने झडप घातली. मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या खासगी बसचा पनवेलजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला.

बस समोर अचानक ट्रॅक्टर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणात बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. खाजगी बस डोंबिवलीहून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघाली होती.

बस २० फूट खोल दरीत कोसळल्याने बसमधले प्रवाशी जखमी झाले. यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर मधल्या दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. बस मधले सात प्रवाशी गंभीर जखमी असून, त्याच्यावर कामोठे येथे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ४२ भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे समजू शकली आहेत. गुरुनाथ बापू पाटील, रामदास नारायण मुकादम, होसाबाई पाटील असे मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आहेत. तसेच ट्रॅक्टरमधील दोन पुरुषांचे मृतदेह सापडले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त बसला बाहेर काढले. मदत कार्यामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मदत कार्य पूर्ण झाल्यानंतर पुण्याकडे जाणारी लेन खुली करण्यात आली.