
राज्य सरकारकडून मदतीची घोषणा, या शेतकऱ्यांनाच मिळणार मदत, हे दोन ते तीन दिवस धोक्याचे फडणवीसांचे निर्देश

चंद्रपूर – अतिवृष्टीमुळे राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यांना अतिवृष्टी व पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी तातडीने २ हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच प्रभावित कुटुंबांना तात्काळ १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बुधवारपासून ही मदत दिली जाणार आहे.

फडणवीस म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानी संदर्भात निकषात कोणाला न अडविता सर्वांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकसान भरपाईसाठी फक्त नुकसानाची नोंद असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो स्वतः काढले असतील तेदेखील मान्य करू असे त्यांनी यावेळी सांगितले. नुकसानी संदर्भात राज्यातील ज्या भागांचे पंचनाम्यांचे अहवाल शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्यांच्यासाठी शासनाने या अगोदर २ हजार ३०० कोटी रुपये दिले आहेत. प्रभावित कुटुंबांना तात्काळ १० हजार रुपयांची मदत दिली जात आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.फडणवीस यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण पाहणी व पंचनामे झाल्यानंतर अधिकची मदत शेतकरी व नागरिकांना दिली जाईल. उद्या सोमवार आणि मंगळवारचा दिवस खूप महत्वाचा आहे. सलग तीन दिवस हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असल्याने जिल्हा प्रशासनाला अलर्ट मोड वर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दोन तीन दिवसानंतर बंगालच्या उपसागरातील वादळ कमी होईल आणि त्यानंतर परतीचा पाऊस सुरू होईल. तेव्हा आगामी तीन दिवस महत्वाचे आहेत असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे ८ जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यांना काही सूचनाही केल्या आहेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचे संसार अतिवृष्टीमुळे कोलमडले आहेत. जमीन खरडून गेली आहे, पिकांची नासधूस झाली आहे. पुढील दोन दिवस पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.









