
कर्जमाफीच्या आशेने शेतकरी कर्ज भरेना? बँकांचे गणित बिघडले? शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांचा नकार

मुंबई – महायुती सरकारने विधानसभा निवडणूकीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण सत्तेत आल्यानंतर मात्र आर्थिक कारण देत सध्यातरी कर्जमाफी देण्यास असमर्थता दर्शवली आहे. पण यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून, आता बँकांनी सुद्धा शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास नकार दिला आहे.

राज्यातील २० लाख ३७ हजार २१० शेतकऱ्यांकडे बॅंकांची ३१ हजार २५४ कोटींची थकबाकी असल्याची बाब राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे. सरकारकडून कर्जमाफीची आशा असल्याने शेतकरी सध्या बॅंकांची थकबाकी भरत नसल्याची स्थिती आहे. यामुळे बँकांचे मात्र आर्थिक गणित बिघडले आहे. खरीप सुरू होऊन महिना संपत आला, तरीदेखील बॅंकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्याचीही वस्तुस्थिती आहे. सरकारने आदेश देऊनही शेतकऱ्यांचे सिबील पाहिले जात आहे, त्यामुळे त्यांना कर्जमाफी देण्यास नकार दिला जात आहे. महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सर्वाधिक कर्ज थकबाकी आहे. यामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, बुलढाणा, जालना, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, सोलापूर व यवतमाळ या जिल्ह्यांच्या समावेश आहे. यातही नाशिक, सोलापूर आणि यवतमाळ हे जिल्हे पहिला तीन क्रमांकावर आहेत. सरकारकडून असलेली कर्जमाफीची आशा याबरोबरच मॉन्सूनपूर्व पावसामुळे नुकसान, उसाची एकरकमी एफआरपी मिळत नाही, पिकांना हमीभाव नाही, अतिवृष्टी, महापूर अशा संकंटांमुळे शेतकरी बॅंकांची थकबाकी भरत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
राज्यातील थकबाकीदार शेतकरी २०,३७,२१० शेतकऱ्यांकडे तब्बल ३१,२५३.५९ कोटींची थकबाकी आहे. बँका कर्ज देत नसल्यामुळे राज्यात दरवर्षी अडीच हजारापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यातही छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नाशिक, नागपूर या विभागांमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.









