मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक पाणी परिस्थितीचा आढावा, असा असेल आगामी पावसाचा अंदाज?
मुंबई – राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि विभागाने केले आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. दक्षिण व्दीपकल्पीय भारताच्या भूभागातील कर्नाटकात १२ ते १५ जून दरम्यान आणि कोकण आणि गोवा येथे १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सादरीकरणाद्वारे दिली. त्यांनी सांगितले की, मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या तीन ते चार दिवसांत आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात १२ जून रोजी मराठवाड्यातील काही भागात १२ ते १४ जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा येथे १२ आणि १५ जून दरम्यान मुसळधार तर १३, १४ जून रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व प्रमुख धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पाऊस, पीक पाणी, धरणाच्या जलाशयातील पाणी साठा आदीचा आढावा घेण्यात आला आहे. राज्यातील सतरा जिल्ह्यात पंचवीस टक्के पेक्षा कमी, बारा जिल्ह्यात पंचवीस ते पन्नास टक्के, चार जिल्ह्यांत पन्नास ते पंच्याहत्तर टक्के तर एका जिल्ह्यात शंभर टक्के हून अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील विविध विभागांत खते आणि बियाणे यांचा सुरळीत पुरवठा झाला आहे. अनेक भागात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
गोसीखुर्द ४.६४ टीएमसी (८.६७), तोतलाडोह १८.७९ (१८.१४), ऊर्ध्व वर्धा ८.८५ (८.८७), जायकवाडी २२.६०(२.९९), मांजरा १.६३(०.००), ऊर्ध्व तापी हातनूर ५.३२(२.६३), गंगापूर २.५०(२.४८), कोयना १७.३६(१०.००), खडकवासला०.८४(१.०३), उजनी १८.७२(०.००), भातसा ९.९५(८.१७), धामणी ३.११(१.७७).