पोलिसाला खोट बोलण महागात, पोलीस कर्मचारीच निलंबित, बघा नेमकी बातमी काय ?

पुणे प्रतिनिधी – गोरव कवडे | लोकसभा निवडणूक  बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले होते. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन पोलीस अंमलदाराने आजारी असल्याचे खोटे कारण सांगितले. यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी बुधवारी (दि.17) यासंदर्भात आदेश दिले आहेत.

भूषण अनिल चिंचोलीकर (नेमणूक, मुख्यालय, पिंपरी-चिंचवड) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कार्य़ालयीन आदेशानुसार 12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 50 कर्मचाऱ्यांची नेमणूकीबाबत आदेश प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या 50 कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली होती.

यामध्ये भूषण चिंचोलीकर यांचाही समावेश होता. दरम्यान, बंदोबस्तासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची 10 एप्रिल रोजी निगडी येथे पोलीस मुख्यालयात हजेरी घेण्यात आली. त्यावेळी भूषण चिंचोलीकर गैरहजर होते. आजारी असल्याचे त्यांनी फोनवरुन मुख्यालयात कळवले. चिंचोलीकर यांच्या आजारपणाबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काळे  यांच्याकडे चौकशी करण्यात आली. चिंचोलीकर हे जुलाब, उलटी, ताप, पोटदुखीचा त्रास होत असल्याने औषधोपचारासाठी आपल्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी आले होते,असे डॉ. काळे यांनी सांगितले. त्यांना रुग्णालयात दाखल होऊन तपासण्या करण्यास सांगितले. परंतु, चिंचोलीकर यांनी कोणत्याही तपासण्या केल्या नाहीत. त्यांना होत असलेला त्रास हा गंभीर नसल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.

अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तासाठी नेमणूक केली असताना आजारी असल्याबाबत खोटे कारण सांगून बंदोबस्त चुकविण्यासाठी चिंचोलीकर गैरहजर राहिले. वरिष्ठांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन आदेशाची अवहेलना केली. तसेच कर्तव्यात गंभीर स्वरुपाची कसुरी केली. त्यांचे हे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणाचे असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे, चिंचोलीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.