पुण्यात बनावट चलनी नोटा बाळगणार्‍या अटक ; सव्वा पाच लाखांच्या बनावट नोटा जप्त

बनावट चलनी नोटा बाळगणार्‍या एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सव्वा पाच लाख रुपयांच्या ५०० रुपयांच्या २५० नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

निलेश हिराचंद वीरकर (वय ३३) असे त्याचे नाव आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत होते. सातारा रोडवरील पद्मावती बसस्टॉपसमोर ते आले. पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना एक जण गडबडीने स्वारगेटच्या दिशेने जात असल्याचा दिसला. त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करुन काही अंतरावर पकडले. त्याने आपले नाव निलेश विरकर असे सांगितले. गडबडीत निघून जाण्याचे काय कारण आहे, असे विचारता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. सारखा पँटचे खिशात हात घालत होता. तेव्हा पोलिसांनी त्याचे खिसे तपासल्यावर त्यात ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले.

त्याबाबत विचारणा केल्यावर त्याने या नकली नोटा असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन नकली नोटा चलनात चालविण्यासाठी जवळ बाळगल्या होत्या, असे त्याने सांगितले. त्याला पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली. त्याच्याकडील २५० नकली नोटा जप्त करण्यात आल्या.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील़ सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, सागर सुतकर, अभिजित बालगुडे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पदमाळे, खंडु शिंदे, योगेश ढोले, महेश भगत, महादेव नाळे, सागर कुंभार यांनी केली आहे.