महाविकास आघाडीमध्ये बिघाडी ? ‘या’ मतदारसंघात दोन्ही पक्षांकडून उमेदवारी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष आपले उमेदवार जाहीर करताना दिसत आहेत. जवळपास बहुतांश मतदारसंघातील लढती आता निश्चित झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरुन चर्चा सुरु आहे.

यादरम्यान ” राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष” आणि शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. परांडा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या पक्षाकडून राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता परांडाच्या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात राहूल मोटे यांच्या नावाचा समावेश आहे. या नावामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. परंतु जयंत पाटील यांनी आम्ही परांड्याच्या जागेवरून उद्धव ठाकरेंशी चर्चा करू असे म्हंटले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या ठिकाणी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.