
पुणे शहरात गेल्या दोन दिवसांत तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. आता पुण्यातील दांडेकर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यातील एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन एकाला बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना दांडेकर पूल परिसरात सोमवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. कौस्तुभ जयदीप नाईक (वय-२९) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पंकज नांगरे (वय ३१) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कौस्तुभचे आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. बहिणीला पळवून नेण्याची धमकी त्याने आरोपीला दिली होती. या कारणावरुन आरोपीने कौस्तुभला सोमवारी सायंकाळी दांडेकर पूल भागात बोलावून घेतले. आरोपी आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी कौस्तुभला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत कौस्तुभ गंभीर जखमी झाला. तातडीने कौस्तुभला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्यचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.









