‘आता मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही. आम्ही या नेत्यांचे गुलाम नाही’

नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये रविवारी ३९ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. पण यानंतर इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून अनेकांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर आरोप केले आहेत. त्यातच सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसला आहे. आता पुण्यातील एकमेव आमदाराची नाराजी समोर आली आहे.
महायुतीतील तीनही पक्षांनी धक्कातंत्राचा अवलंब करत यावेळी अनेम जुन्या चेहऱ्यांचा पत्ता कट करत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्याचबरोबर अडीच वर्षाचा निकषही ठरवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.

पुरंदरचे शिवसेना आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. कारण इथं प्रादेशिक समतोल न राखता जातीय समतोल राखण्यासाठी प्राधान्य दिल्याचं दिसत आहे, मला मंत्रिपद मिळालं नाही, याचं जास्त वाईट वाटत नाही. मात्र महायुतीतील तीनही नेत्यांनी जी वागणूक दिली, ती चुकीची आहे. हे नेते साधे भेटायलाही तयार नाहीत, आता अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी मी ते घेणार नाही. आम्ही या नेत्यांचे गुलाम नाही,” असं म्हणत शिवतारे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांची मंत्रिपदाची संधी हुकली आहे. त्यामुळे अनेकजण उघड नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांना थोपवण्याचे काम पक्ष नेतृत्वाला करावे लागणार आहे.

फडणवीस सरकारमध्ये शपथ घेतलेल्या ३३ कॅबिनेट मंत्र्यांमध्ये भाजपचे १९ शिंदेसेनेचे ११ आणि अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. राज्यमंत्र्यांमध्ये भाजपचे तीन, शिंदेसेनेचे दोन आणि अजित पवार गटाच्या एकाचा समावेश आहे. पण त्यांना अद्याप खात्याचे वाटप करण्यात आलेले नाही.