
बीड: साताऱ्यातील फलटण येथे घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावरच सुसाईड नोट लिहून आयुष्याचा अंत केला. त्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर यांची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत. डॉक्टर ने आपल्या शेवटच्या संदेशात गंभीर आरोप करत म्हटले आहे की, बदणे याने तिच्यावर चार वेळा अत्याचार केला, तर बनकर मागील चार महिन्यांपासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. या दोघांच्या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे तिच्या लिखित नोटमधून समोर आले आहे. या धक्कादायक घटनेनंतर आता मयत तरुणीच्या कुटुंबीयांनीही काही खळबळजनक आरोप केले आहेत. डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनीही अद्याप आम्हाला शवविच्छेदन अहवाल देण्यात आलेला नाही.डॉक्टर मयत झाल्यानंतर तिचा मोबाईल 3 वाजेपर्यंत सील करण्यात आला होता. याबद्दल आम्हाला शंका असल्याचं मयत डॉक्टरच्या चुलत बहिणीने म्हटलं आहे.

तर मृत डॉक्टर तरूणीच्या आतेभावाने मोबाईल सील करण्यात आला असं आम्हाला पोलिसांकडून सांगण्यात आलं. आम्ही तीन वाजेपर्यंत तिथे पोहोचलो होतो. पोलिसांनी मोबाईल सील केला असं सांगितलं होतं. पण तिचे व्हाट्सअप सीन लास्ट चेक केल्यानंतर 11 वाजून 13 मिनिटाला आहे. मग मधल्या वेळेत तो मोबाईल कोणी चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नसल्याचं मयत डॉक्टरच्या आते भवाने म्हटल आहे. त्यामुळे या ठिकाणी शंका असून तिची हत्याच झाल्याचा दावा कुटुंबातील आते भावाने केला.

आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही, तर तिची हत्या करण्यात आली आहे. आरोपीने सर्व पुरावे नष्ट करून मग पोलीसांकडे सरेंडर केलं, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्याचबरोबर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीनं मयत डॉक्टरच्या फिंगर लॉकचा वापर केला, असा खळबळजनक दावाही कुटुंबीयांनी केला आहे.
डॉक्टर तरूणीने गळफास घेतल्याची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. मात्र कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता. दरम्यान, मृतदेहाच्या हातावर सुसाईड नोट आढळली असतानाच, कुटुंबीयांनी असा संशय व्यक्त केला की, मृत डॉक्टरचे फिंगर लॉक मोबाईल उघडण्यासाठी वापरण्यात आले आणि त्यातील महत्त्वाचा डाटा, तसेच घटनेसंबंधित पुरावे डिलीट करण्यात आले, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. कुटुंबीयांच्या या नव्या दाव्यामुळे डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. तूर्तास दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. दोघांची कसून चौकशी केली जात आहे. मयत तरुणीसह इतर आरोपींचे देखील सीडीआर काढण्यात आले आहे. मयत तरुणी आणि आरोपीचे एकत्रित लोकेशन्स आढळतात का? याचा तपास पोलीस करत आहेत.









